बालपणींचे काही विनोदी किस्से
मित्रांनो मागील भागात आपण काही बालपणातील विनोदी किस्से बघितले. या भागात आपण अजून काही
किस्से बघूया.
उन्हाळ्याच्या सुट्टीत
गावाकडे गेल्यावर शेत शिवार फिरून बाभळीला असणारा डिंक जमा
करणे हा आमचा सकाळ आणि संध्याकाळचा उद्योग, आणि मात्र दुपारला डिंक गोळा झाले की, जुन्या माठाचा (मडके) गोल काठ छाटून छाटून त्यावर कागद डिंकाने चिपकवून किंवा डिंक नसल्यास बेलाच्या फळातील गराने चिपकवून डफळी बनविणे, ते वाजवीत गल्लीबोळातून फिरणे
हा नित्याचा उपक्रम. मग बऱ्याचदा माठाचे गोल काठ (कठगर) फोडून काढता काढता फुटायचा त्यामुळे दुसरा माठ शोधायचा व परत कामाला लागायचे.

नेहमीच माठ शोधण्याच्या कामासाठी गावातील मित्र दिवाकरच मदत करायचा, मग कधी-कधी माठाची कमतरता भासली की, आजीला जुन्या रिकाम्या माठा साठी विचारायचे, ''ए आजीSSओ, तो जुना माठ घेऊकाSSवं, फुटलाच तं हाये'', ''नोको घेऊ, मले तिर भराले लागते'' असा आजीने नकार दिल्यावर, आमची शोध मोहीम दुसरीकडे सुरु व्हायची. कधी या गल्लीत तर कधी त्या गल्लीत. एखाद्याच्या गल्लीत फुटका रिकामा जुना माठ दिसल्यास त्यांना तो मागायचा, आणि त्यांनीही नकार दिल्यावर मात्र आमचा नाईलाज व्हायचा.
त्या काळात खेड्यामध्ये जुन्या बारीक फुटलेल्या, भेगा गेलेल्या माठांचा वापर तीळ, धान, जवस, इत्यादी प्रकारचे धान्य भरून ठेवण्यास करीत असत, तर माठ जुना पण फुटलेला नसल्यास त्याचा वापर बाथरूम मध्ये पाणी भरून ठेवण्यास करीत असत. बाथरूम भोवती गवताच्या झांज्या बांधलेल्या असायच्या तर वरून गवत आणि बांबू तागाच्या साह्याने गोलाकार बांधून ठेवल्या गेले असायचे त्यास हिरले असे म्हणत. घरा शेजारील लुगडे घातलेल्या बायांना आम्ही आजीचं म्हणायचो.
चार घरं फिरून मागूनही माठ न मिळाल्याने आमचा तिळपापड व्हायचा, ''जब सीधे उंगलीसे घी न निकले तो, उंगली टेढी करना पडता है।'' या हिंदी म्हणीप्रमाणे नाईलाजाने आम्हास गैर मार्गाचा वापर करावा लागायचा. मग काय याही कामात आमचे कॅप्टन दिवाकर साहेब आघाडीवर असायचे.
''आबे ओSSदिव्या, शामराव वाढयाच्या गल्लीतलं मडकं उडव, तेथ चांगल मोठ मडकं हायेSSबे!'' असे म्हणून प्रसादने त्यास हरभऱ्याच्या झाडावर चढविल्या बरोबर त्यास स्फुरण चढले.
शामराव वाढई म्हणजे घरामागील सुतार काम करणारे आप्पाजी. त्यांच्या आणि आमच्या घरामधे जवळपास तीन फुटांची गल्ली (बोळ) त्यावेळेस अस्तित्वात होती. बाजूलाच ते सुतार काम करीत असायचे.
पुढल्याच क्षणी दिवाकरने हातात मोठा दगड घेतला तो त्या माठाकडे भिरकावून माठ फोडला. माठ फुटल्याच्या आवाजाने आजी तळमळत "कोण आहे रे तिकडे " असे ओरडत घरा बाहेर यायला लागली. आजीचा आवाज ऐकून दिवाकर घाबरला. पण घाबरून पळून जाईल तो दिवाकर कसला. येणाऱ्या प्रसंगाला तोंड देणे हा त्याचा स्वभाव.
"ए, धिय्ये!!!!, ह्य क़क़क़ चायला हे गाय धरुं...तं, काय व आजी हे गाय गल्लीमधी घुसतपर्यंत तुले कसं काय माहिती नाय व!" असे ओरडत गाय दूर हाकलल्याचे नाटक करत पळाला.
बऱ्याच वेळानी सर्व वातावरण शांत झाल्यावर दिवाकर परत येऊन आजीला म्हणतो "गाईन त मडकं फोडलं व! मले डफली बनवाले देते का? आता तू त्या मडक्याच का करशील व?" आजीचा नाईलाज व्हायचा व ती माठ देऊन टाकायची. अश्या प्रकारे आमची उन्हाळ्याच्या सुट्टीतली दिनचर्या असायची. सुट्ट्या कश्या संपल्या ते कळायचेच नाही.



