Thursday, 16 June 2022

पुरातन काळात भाट समाजाचे महत्व आणि त्यांचा इतिहास........

           भाट हा शब्द संस्कृत शब्दातून उत्पन्न झालेला असून भाट म्हणजे स्तुतीपाठक, राज दरबारात गायन करणारे, वंशवळीचा इतिहास सांगणारे असे संबोधले जाते. भाट हे मुळतः राजस्थानचे असून साडे बारा जात म्हणूनही ओळखले जाते. ब्राह्मणांकडून चार्तुवर्णीय व्यवस्था आखली गेलेली होती. तसेच, कामानुसार वर्ग विभागणी करण्यात आली होती. वंशवळीचा इतिहास लिहीणारा आणि राजदरबारात गायन करणारा 'भाट' हा भटका समाज इतकच आकलन त्यावेळी झालेल. म्हणूनच आपल्या वंशवळीचा इतिहास जाणणाऱ्या या भाटांचा इतिहास तर बघायलाच हवा.भाटांच्या गायन व स्तुतीपाठक कामामुळे त्यांना वैश्यवर्णिय म्हणतात. वंशावळीचा इतिहास लेखन भविष्य सांगणे तसेच जानते घालण्याची पद्धत यामुळे त्यांना ब्राह्मणवर्गीय पण म्हणतात. परंतु ब्राह्मणांनी चातुवर्णीय व्यवस्थेनुसार भाटांना क्षत्रियांमध्ये स्थान दिले होते. भाटांच्या वस्तीस्थाना पासून त्यांना राजपूत भाट, गुजराती भाट, मराठे भाट अशी नावे मिळाली होती. त्यांच्यात राजभाट,ब्रह्मभाट, भारोट चारण, वोखा वहीवंचे, कंकाळीभाट, राणी मंगा भाट, मारवाड़ी भाट,चंद्रसा, बूनाशासनी, तूरी, वेदारी अश्या पोटजाती बघायला मिळतात.खानदेशात परदेशी भाट, मराठे भाट, कुणबी भाट असे तीन पोटभेद आहेत. विदर्भामध्ये व्हाड भागात वासुदेव, गोंधळी, कंजरभाट, गुरत हा भाट समाज आहे. पूर्वीच्या राजे राजवटींच्या काळात प्रत्येक राजांकडे एकतरी भाट असायचाच. पृथ्वीराज चौहान राजाकडे चंद्रदाई हकावी नावाचे भाट होते. बळीराजा जवळ पिंगळा, रामाजवळ रंपाळ, पांडवांजवळ सूत, कौरवांजवळ संजय होते. भाटांचे मुख्य काम म्हणजे राजाची स्तुती गायन पद्धतीने करणे. राजाच्या वंशावळीचा इतिहास व वर्णन काव्यरुपात करणे, भाट हे बोलके होते. स्पष्टवक्ते असायचे हा गुण चांगला आणि दोषयुक्त ही संबोधू शकतो कारण, त्यामुळे राजेलोक त्यांच्याशी थोडे जपूणच असतं. त्याकाळात कोणताही राजा भाटाची हत्या करित नव्हते. भाटानी लिहिलेले लेखन हे ताडाच्या पानावर असायचं. त्यांनी रचलेल्या कवनांना अष्टपदी, कुंडली. चौपाई. छप्पा, सवाई. दोहे, कबीत छंद प्रबंध, गीत केहेवत असे म्हणतात. भाट स्पष्टवक्ते सहीत स्वामीनिष्ठ होते. प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा यामुळे भाटांना राजदरबारात राजे खूप मान द्यायचे. अकबर बादशाहा देखील खूप मान द्यायचा, राजांच्या कुटुंबासोबत परगावी जाण्यासाठी भाटांना सोबत पाठविण्याची पद्धती होती. तेव्हा भाटांजवळ कट्यार किंवा भाला यासारखी शस्त्रे असायची. भाटांमध्ये वेगवेगळे पंथ आहेत. कबीर पंथी, शैव, वैष्णव, रामनंदी, स्वामीनारायण इ. ब्राह्मणांप्रमाणे भाटामध्ये उपनयनादि संस्कार करण्याची पद्धत होती, भाटामधील कंजर भाट ही जात गुन्हेगार म्हणूनही प्रख्यात होती. महाराष्ट्रात भटक्यांपैकी १३ भटक्या जमाती गुन्हेगार म्हणून घोषित केल्या होत्या फासेपारधी, कंजारभाट, पेंढारी याजातींना इंग्रजही फार घाबरायचे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना मुक्त केले. पृथ्वीराज चौहान राजाच्या दरबारी चंद्रदाई हकावी नावाचा विश्वासू भाट होता. महम्मद गोरीने राजा पृथ्वीराज चौहानला पकडून आणून त्यांचे दोन्ही डोळे फोडले आणि त्यांना बंदी बनविले जेव्हा आपल्या राजाच्या शोधार्थ चंद्रभाट महम्मद गोरीच्या दरबारात आले तेव्हा, चंद्रभाटाला पृथ्वीराजांचे शौर्य माहीती होते. ते महम्मद गोरीला बोलले की, तुला राजांनी सोळा वेळा माफ केले. त्यांची हीच चुकी झाली. असे बोलताच, गोरीने हकावीला सुद्धा बंदी केले. गोरीनी तिरंदाजी खेळाच आयोजन केले हुशारीने त्यात चंद्रभाट आणि पृथ्वीराज चौहान यांनी प्रतियोगीतेत सहभाग घेतला. राजा पृथ्वीराज चौहानला 'शब्दभेद बाण' ही धनुरविद्या कला येत होती. नियमानुसार प्रतियोगितामध्ये कुणीही भाग घेवू शकतो. याचाच फायदा चंद्रभाट आणि राजा पृथ्वीराज चौहान यांनी घेतला होता. चंद्रभाटाने खास शैलीतून काव्य गायन केले. गोरी कुठे आहे हे त्यांना दोह्याच्या माध्यमातून सांगितले.


चार बास चौबीस गज़

अंगुल अष्टप्रमाण

ता उपर सुलतान है।

मत चुके चौहान


हा दोहा गायन करताच राजा पृथ्वीराज चौहान यांनी बाण त्या दिशेने चालविले. महम्मद गोरी जागीच मरण पावला. शेवटी शत्रुच्या हातून मरण्यापेक्षा राजाने चंद्रभाटला स्वःताची हत्या करण्यास सांगितले पण, राजाची हत्या केल्यानंतर स्वामिनिष्ठता भंग होवून विश्वासूपणा वर डाग लागणार हे चंद्रभाटला माहीती होते म्हणूण चंद्रभाटने स्वःताची हत्या राजाला करण्यास सांगितले या घटनेनंतर भाटांना राजस्थानमधून बाहेर काढण्यात आले होते. ज्याप्रकारे फाळणीमध्ये काही मुस्लिम समाज भारत देश सोडून गेले नाही. त्याचप्रकारे काही भाटांनी ही राजस्थान सोडले नाही ते आजही तेथे वास्तव करीत आहेत. उदयपुर भागात भाट समाज मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. फणसवाडी, करडवाडी, गारगोटी, सोनाली, खानापूर, कासारवाडा, मुरगुड, वाळवा, निगपे येवती चये, म्हाळुंके, बेले. बेलवले, कुरुकली, कुरूवली, कोथळी, राधानगरी, येलवडे, हसुर, सावर्डे, सदोली, हिरावडे, बचनी, बहिरेश्वर, आरे, बीड माठे, खांधंगळे, कोंगे, सातारडे, म्हारूल, यावलुज, साबळेवाडी, भाठवडे, बांबवडे या शहरामध्ये हा समाज वास्तव्यात आहे. राजस्थान सोडलेल्या भाटांनी मात्र स्वःताच्या उपजिविकेसाठी साडे बारा प्रकारची कामे केली आणि त्यावरून सोनारभाट, कलारभाट, माळीभाट, राजभाट इ प्रकारची साडे बारा जाती म्हणूण ओळखली जाणारी जात म्हणजेच 'भाट' आहे. आता ना राजे-राजवाडे राहीले ना त्यांच्या पदरी असलेले भाट राहीले आता भाट समाज विविध व्यवसाय करण्यात गुंतलेला आहे परंतु, त्यांच्यामुळे कितीतरी काव्यांचे प्रकार आणि शैली लोकांना माहीती झाल्या. अश्या भाटांचा इतिहास सगळयांना माहीती व्हायला हवा.







लेखन 

सौ.नूतन अशोक मुळणकर

नांदगांव

जिल्हा-नाशिक

यांचे सौजन्याने





Monday, 9 May 2022

हल्लीच्या राजकारणात भरकटलेला तरुण - *भडकवणारे " आणि " भडकणारे*

इंटरनेटवर सापडलेला एक अतिशय अर्थपूर्ण मेसेज, कुणी लिहीलंय माहीत नाही, पण सुंदर आहे.

खरोखर वेळ काढुन वाचा.


" भडकवणारे " आणि " भडकणारे "

----------------------

तो एक तरूण..... अत्यंत हुशार..... सर्वांचा लाडका.....


हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना.....

गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची.....


करिअर गेलं, वर्ष वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला.....


का.....?????


का तर याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले.....

आणि..... हे घडले.....


हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.


पण लक्षात ठेवा.....


आज जगात दोन प्रकारचे लोक आहेत.....


दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे.....


भडकवणारे

दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात.....


आणि.....


भडकणारे दारूप्रमाणे द्वेष पितात.....


दारूची नशा लगेच उतरते, पण द्वेशाची नशा चढत राहते....


आणि.....


एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो.....


आणि.....


दारू पिणारा भिकारी होतो.....


तसे भडकवणारे मोठे होतात


आणि.....


भडकलेले, बरबाद होतात.....


आज आपला तंबाखू सारखा वापर करून घेतला जातोय.....


यासाठी.....


छत्रपती शिवाजी महाराजांचे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले जाते.....


त्यांच्या नावाने भडकावले जाते.....


ज्याने भडकावले, त्याचा मुलगा स्टडीरूममधे.....


आणि.....


जे भडकले ते कस्टडी रूममध्ये.....


ज्यांनी भडकवले त्याचा मुलगा अभ्यास करतोय.... .

आणि...

जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय.....


ज्यांनी भडकवले त्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो.....

आणि.....

जे भडकले ते देशी प्यायला शिकतायत...


भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड इंग्लिश बोलतो,

आणि.....

भडकणारा, बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेला तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतोय.....


भडकवणारे

परदेशातून विमानाने भारतात येतात.....

आणि.....

भडकणारे.....

शिवाजीनगर - 

१० रूपये..... १० रूपये

संभाजीनगर -

५ रूपये..... ५ रूपये.....

बसा ना.....

ह्या बाजूला.....

त्या बाजूला.....

गाडी भरली की

लगेच निघणार.....

१० रूपये..... ५ रूपये.....


भडकवणारे

विमानतळावर उतरतात.....

भडकणारे गर्दीत घोषणा देतात.....

.....आमके तमके आगे बढो....

हम तुम्हारे साथ है.....

बजाव.....

वन्स मोअर.....

ढिंगच्यांग ढिच्यांग.....


भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाॅटेलात ऐटीत बसतो.....

आणि.....

भडकणारे तिथं वेटर असतात.....


कुठे गेली लाज.....

कुठे गेला आत्मसन्मान......

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता.....


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता.....


पण स्वाभिमान मात्र गहाण टाकलाय.....

लाजाही वाटत नाही.....


अरे किती दिवस..... किती पिढ्या.....

आपल्या तरूणांना वाटत नाही का...?

स्वतः काही तरी स्वाभिमान निर्माण करावा.....

दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.....

दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावं.....

दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतःचे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं..... कधी कळणार आम्हाला हे.....???


आज आमच्या पोरांचा केवळ वापर करून घेतला जातोय.....

कुणाच्या तरी विरोधात..... भांडण करण्यासाठी..... मारामारी करण्यासाठी.....

कसा होणार आमचा भारत देश महासत्ता....?

२१व्या शतकात आहोत.


पण आमची पोरं काय करतायेत.....

वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करणे.....


हीच गोष्ट मनाला खटकत होती..... वाईट वाटत होते..... तळमळ वाटत होती..... पण सांगणार कुणाला...???


एकमेकांशी वाद लावतोय, वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय.....


भावांनो,


वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.....


आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला, भावाला, गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का ?


का नाही लावत...???


अरे, विचार करा.....


आणि.....


तरीही जर तुम्ही भडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर 

तुमचं भविष्य अंधारात आहे.....


विचार करा.....


कुणाचं ऐकून का बरबाद होता...???


या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांचे ऐका..... नोकरी, व्यवसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या.....


कोणी जर कुणा विरोधात भडकवले तर त्याला सांगा.....


अगोदर स्वतःच्या मुलाला सांग.....

त्याला गाड्या फोडायला लाव.....


म्हणजे.....


काम करायाला आम्ही आरामाला तुम्ही.....


बनवायला आम्ही खायला तुम्ही.....


रस्त्यावर आम्ही पेपरात तुम्ही.....


तुरूंगात आम्ही tvवर तुम्ही.....


हे आता थांबले पाहीजे.....


तरूणांनो,


जागे व्हा.....


दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा.....

आपण कुणाचे गुलाम नाही ना....???


आपला कुणी वापर करत नाही ना.....???


विचार करा.






-----०००-----

  




Wednesday, 27 April 2022

*आईचे_डोळे*


लेखक- श्री. प्रविण दवणे.


खूप सुंदर कथा आहे. पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी.-


  गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकुष्णाच अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधता प्रश्न पडला- 'अशा झोपडपट्टीत राहतो रामकुष्ण ? पण राहतो किती नीटनेटका.' त्याच्या व्यक्तीमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. 

      गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो. 'इथंच तो राहतो', म्हणून कुणीतरी सांगितलं.

       काळोखातून प्रकाश बाहेर यावा तसा सलील माझ्या आवाजानंच बाहेर आला. "सर ?" आत गेलो. "अभिनंदन!" गुच्छ देत म्हटलं.

      मला जायला तसा तीन-चार दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ थांबून आता रूटिन सुरू झालं होतं.

     गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाचं हे असं घर ?रामकुष्णं अभ्यास कुठे केला असेल ? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्याने अभ्यास कसा केला असेल ? त्याचं पुन:पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात ते काळोखे कोपरे पाहत स्वतःलाच विचारीत होतो.

      "सर, खूप खूप बरं वाटलं, खरं तर तुम्ही घरी आलायत, हे खरंच वाटत नाहीये. सावरलेलो नाहीये मी. तुमच्यासाठी चहा करतो," म्हणत तो स्टोव्हला पंप मारू लागला. 

     "रामकुष्ण, राहू दे. आपण बाहेर घेऊ,"

      "तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो. फक्त चहाचं." चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. 

     ''घरात दुसरं कुणी ?"

     "ताई आहे. टायपिंगच्या क्लासला गेलीय. वडील किराणा दुकानात हमाल आहेत."

   "आई... ?"  "आई ? नाही." रेंगाळलेली स्तब्धता कशी प्रवाही करावी या विचारानं मी गोंधळलो. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता. अगदी जीव ओतून !

      "रामकुष्ण, तू मार्गदर्शन व्याख्यानमालेत येत होतास. भेटत होतास. उत्तरपत्रिका पुन:पुन्हा तपासून घेत होतास. पण तेव्हा तुझ्याकडे पाहून...."

      "सर, माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का ? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कृणीतरी 'अरेरे' करून म्हणणं... यानं काय साध्य होतं? आतासुद्धा मला खूप बक्षिसं मिळालीत. पण ती कायम पुरणार आहेत का ? पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार. टीव्हीवाले आले, निघून गेले. एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष आणि आमदार खासदार गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही आले नाहीत. सर, परिस्थिती माणसाला आहे त्यापेक्षा मोठं करते."

     रामकुष्णाची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती. ती वाक्या- वाक्यातून, डोळ्यातून चमकत होती. "कुठून शिकलास हे सगळं ?"

    "सभोवतीच्या मुलांकडून,"

      "म्हणजे ?"

      "ती नुसताच टाइमपास करतात. बहुतेक नापास होतात. मग रात्री जुगार !

      चोरी , लुबाडी हा त्यांचा उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात ! तेव्हा ठरवलं- आपण तसं व्हायचं नाही. 

    याच वर्षी नाही: सातवीतच ठरवलं. सातवीतच माझी आई गेली. इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. साध्या न्यूमोनियानं."

       "बदलेल सारं...."

       "बदलतंच आहे, सर. गरिबीचा विचार करायला वेळच कुठे आहे ?" तसे आपले डोळे क्वचितच भरून येतात. काळजाशी दडलेले अश्रू क्वचितच पापणीच्या काठावर येतात.

       माझ्या आणि अनेक कॉलेजांच्या भोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या, फी देऊन प्रवेश घेणारी, तरीही वर्गात बसणं 'पाप' मानणारी असंख्य मुलं !  त्यांच्याच वयाचा रामकुष्ण!

असेही अनेक चेहरे डोळ्यांपुढून झरकन् तरळून गेले.

      "रामकुष्ण, एकदा माझ्या वर्गात ये... मुलांशी गप्पा मारायला."

     "सर, एवढं मोठं करू नका मला. असे काबाडकष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातला वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही. 

  आपण कुठल्या परिस्थितीत जगतो, आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात, याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेच्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क्स मिळतात. क्लासेस बिसेसची चैन झोपाळू मुलांसाठी.!"

      रिक्षापर्यंत रामकुष्णा बरोबर आलो. तिथेही बोलत राहिलो बराच बेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला. "सर, भोवतीची मुलं पाहुन केव्हातरी मलाही थोडी झापड आल्यासारखं होतं."

       "मग, अशा वेळी...?"

      "मी... मी फक्त आईचे डोळे आठवतो."

       "आई ?"

       "राब राब राबायची ती.... कागदाच्या पिशव्या करीत. गोंद-कात्र्या घेऊन आम्ही तिच्याभोवती बसून तिला मदत करायचो. वडिलांची गिरणी संपानंतर बंदच पडली. त्यानंतर वनवास मागे लागला.

      शेवटी ती बोलायची,  'मी काही आता जगत नाही; पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकतोस, मोठा होतोस, ते पाहण्यासाठी.' सर, ते डोळे आठवतात. हो!"

      रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कुणीतरी आपल्याला सांगावंच का लागावं ? 'अभ्यास करा, लवकर उठा, पालक किती मरमर मरतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद् दुसराच.!"

     परवा एक शिक्षिका असलेली पालक आई स्टाफरूममध्ये विषण्ण चेहऱ्याने आली, "मुलगा सकाळी उठतच नाही हो. सातचं लेक्चर नेहमी बुडवतो. ऐकतच नाही. आता म्हणतो, शिकायचं नाही. काही करायचं नाही. कुणाचं मुळी ऐकतच नाही." फक्त रडायची बाकी होती ती बाई.

 खूप काही सुंदर घडविण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात, तेव्हा उशीर झालेला असतो. एक भकास दुपार... आणि निराश संध्याकाळ!

सकाळी उठण्यासाठी 'जबरदस्ती,' कॉलेजला जाण्यासाठी 'जबरदस्ती', मग शिकण्यासाठी.. परीक्षेसाठी.. त्याआधी वर्गात हजर राहण्यासाठी 'जबरदस्ती.!'

      जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का ? रोपानं स्वत:हूनच आतून ठरवलेलं असतं. विद्यार्थ्यानंही असं आतूनच  ठरवायला हवं. आईचे, बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायलाच हवेत का ?

      आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीत शून्य मार्क मिळवताना, बसमधून/ लोकलमधून लोंबकळत येणारे आई-वडील आठवत नाहीत ? मुलांसाठीच पैसे जमा करायला सारखे वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा आठवत नाहीत ? 

      घरात आपण लहान असू, पण जाणीवेनं थोडं समजूतदार झालं, तर पालकांच्या घामाचं गुलाबपाणी होऊ शकतं.

      यशाची राइसप्लेट रेडीमेड मिळत नाही, हे आत्ताच कळायला हवं. यश शिजत ठेवावं लागतं. परिस्थितीच्या धगीनं. कधी महत्त्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवावं लागतं. हे केव्हा कळणार ?

चाळीसाव्या वर्षी ?


      एस.एस.सी. ला फॉर्म भरायला पैसे नव्हते ते रामकुष्णाकडे पाहताना आठवून गेलं. आईच्या हातातली शेवटची सोन्याची बांगडी गहाण टाकण्यासाठी (तीही कधीच न मिळण्यासाठी) निघालेले माझे वडील आठवले.

      आई म्हणाली- "ही शेवटची. पूढे काय ?"

       अजूनही घरातले ते क्षण आठवताहेत. नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते. निष्कांचन आईला पुढे येऊ न देणारे नातेवाईक आठवले. कुणाच्या तरी लग्नात "माझी बोरमाळ तू घाल थोडा वेळ, अगदीच काळी पोत बरी दिसत नाही," असं आईला म्हटल्यावर, "माझी लाज वाटत असेल तर मी येणार नाही. आले तर जशी आहे, तश्शीच येईन." हे बाणेदारपणे सुनावणारी आई आठवली. आणि नंतर ती म्हणाली होती- "माझा दागिना बघायचा असेल तर माझा मुलगा पाहा." त्या वाक्याने केवढी जबाबदारी टाकली आपल्यावर, ते आठवलं.

      असे प्रसंगच झपाटून शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्यात निरांजन होऊन येतात.

      *दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, उदासीनता, ध्येय-शून्यता पार नेस्तनाबूत करते माणसाला.!* 

     मला दिलेल्या एका मूलाखतीतलं आशा भोसले यांचं वाक्य आठवलं, "सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही."

       खुप काही प्रेरणा देणारी ही रसरसलेली आयुष्यं तेव्हाच घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू, अपार विश्वासाने कर्तृत्व गाजविण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठविलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईचे डोळे ! आपल्या आईचे डोळे... !!!

श्री. प्रविण दवणे.

Sunday, 27 March 2022

आपल्या मुलांना जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.

 तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. 


पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. 


दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वगैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... 


तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. 


पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. 


हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. 


दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला.


तिसरा मित्र, तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी, योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला. आणि नंतर तर पहिले २ मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला.


ही काही काल्पनिक गोष्ट नाही. सत्य कथा आहे.


पहिला मित्र, अतिशय हुशार, तो म्हणजे, कोकण रेल्वेचे शिल्पकार, E.Radhakrishnan.त्यांना Metro Man, म्हणुनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते. 


दुसरा मित्र म्हणजे, T. N. Sheshan. अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS Officer. भारतीय निवडणुक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि 


तिसरा मित्र म्हणजे, K. P. Unnikrishnan.लोकसभेवर सलग ५ वेळा निवडून गेले. पंतप्रधान V.P.Singh यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. 


तात्पर्य

शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खुप मोठी असावीत. आपल्या मुलांना ह्या माध्यामांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.


-----Whatsaap Collection----



Sunday, 20 March 2022

कॉन्व्हेंट संस्कृती आणि मराठी शाळा...........

एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना.... ह्या कल्पनेला १०० तोफांची सलामी💣 १००% विचार करायला लावणारी ही गोष्ट. ज्यांचा मुलगा किंवा मुलगी २०२२ मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती. मित्रांनो, माझं नाव विशाल काळे माझा मुलगा देव विशाल काळे याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर ४०,०००पासून १ लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे. मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच. मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागणारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,RVNL, LUPIN, REDDY, AMERRJA, L&T, SBIN, HDFC, ICICI, KOTAK, AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना १ लाख , १ री ला १ लाख , ३ री ला एक लाख.. अस करत करत १७ वीला त्याचे शेअर्स १७ लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत १७ वीला म्हणजे १७ वर्षांनी कमीतकमी ₹ १ कोटी असेल असे त्याच्या नांवे १७ शेअर्स असतील आणि जर आपण मागील १७ वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे १७ वीला सतरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी १.५ कोटी जास्तीत जास्त २१ कोटी..... मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल. विचार करा सर्वांनी ' Be Practical' बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल.. 
- एक शिक्षण व अर्थ तज्ञ पालक -


Tuesday, 8 March 2022

#बालपणीच्या गमती -जमती # - 3 -- परीक्षा आणि मित्र --

                   मित्रांनो, बोर्डाची परीक्षा म्हटले की, विध्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येनारा विषय, काही विध्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात तर काहींना बरेच प्रयत्न करूनही यश लवकर येत नाही. काही महाभाग मात्र चिटिंगचा सहारा सुद्धा घेतात. परीक्षेच्या काळातील काही ना काही आठवणी प्रत्येकांच्या मनात असतातच, त्यापैकीच हा माझ्या आठवणीतील एक किस्सा. 

                  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा विषय म्हणजे फार मोठा वीक पॉईंट, तश्यातच आमचा ग्रामीण भागातील एक मित्र "राजू" हा तीनदा दहावीची परीक्षा देऊनही उत्तीर्ण होऊ न शकलेला विद्यार्थी, त्यामुळे आमच्या चिडविण्याचा विषय ठरलेला मित्र. नापास असल्यामुळे त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण सुद्धा त्याचेवर नाराजच असायचे.

                 हा आमचा मित्र आमच्या घराशेजारीच राहायचा, तो माझ्यापेक्षा दोन वर्ष जुनियर होता. मी सायन्स चा विध्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे तो त्याच्या काही अभ्यासाच्या अडचणी विचारायला यायचा पण तेवढ्यापुरतेच, त्याचे अभ्यासापेक्षा बॉडी बिल्डिंग, जिम याकडे त्याचा जास्त कल असायचा. तो दिसायलाही धिप्पाड, मजबूत बांध्याचा दिसायचा. आई, वडील, भाऊ, बहीण "अभ्यास कर",  "अभ्यास कर" वारंवार म्हणत, त्यामुळे त्यांना दाखविण्यासाठीच जणू माझ्याकडे तो यायचा. मला तो भाऊ म्हणायचा. 

                कालांतराने त्याची बोर्डाची परिक्षा जवळ आली, तो माझ्याजवळ येऊन म्हणाला "भाऊ, म्हाहे सर्व पेपर्स निंघालेत गा, पण फक्त हा इंग्रजी विषयच राहिला गा!!", "तू काहीही कर, पण मले इंग्रजी पेपर पास कराले मदत कर, मी तुले चहा नाश्ता पार्टी देईन". 

                   आता परीक्षा जवळ आल्यामुळे तो अभ्यास करायला माझ्या घरी रोज यायला लागला. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर उठून तो जायचा, त्याच्या अभ्यासासाठी माझा धाकला (लहान) भाऊ सुद्धा मदत करायचा, परंतु दुसऱ्या दिवशी काल अभ्यास केलेल्या भागावरचे प्रश्न विचारले असता, त्याला त्याचे उत्तर सांगता यायचे नाही.  अशीही त्याची अफाट बुद्धिमत्ता. 

                  शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला, "कसागा भाऊ! माझा त पुररा!! अभ्यास झालास त नाही. मले कापी तरी पुरोवजोगा!!",  अश्या आर्त स्वरात तो मला व माझ्या धाकल्या(लहान) भावाला म्हणाला. आम्हा दोघांनाही त्याची किंव आली.  परीक्षेचे सेंटर गावातच होते. आम्ही दोघेही (मी व माझा लहान भाऊ ) सकाळी लवकर उठून तयारी करून त्याला घेऊन, अकरा वाजताचा पेपर असल्यामुळे साडे दहा वाजताच परीक्षा केंद्रावर पोहोचलो. आम्ही सोबत असल्यामुळे राजू ची हिम्मत खूप वाढली, त्याचा आत्मविश्वासही सातव्या मजल्यावर होता.  त्याला बेस्ट ऑफ लक देऊन आम्ही परीक्षा केंद्राबाहेर थांबलो.

                     थोड्या वेळाने मोट्ठ्याने आवाज आला. "महेश भाऊ, ओ .......महेश भाऊ, हे....  हे...... इकडे..... , मागे.... ,  आssगा!!, ....  माझा नंबर खिडकीजवळच लागला गा". पाहतो तर काय? "राजू" खिडकी जवळून आवाज देत होता.  खिडकी जवळ नम्बर लागल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

                     थोड्या वेळाने पेपर सुरु झाला. कोणीतरी दहा मिनिटातच काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लिहून खिडकी बाहेर फेकले. माझ्या लहान भावाने ते घेऊन एका कागदावर त्याची उत्तरे लिहून तयार केली. पण त्याच्या दुसऱ्या मित्रांना सुद्धा ते पुरवायचे असल्याने आम्ही एखाद्या झेरॉक्स सेंटरचा शोध केला,  ते जवळच मिळाले पण त्याने नुकतेच दुकान उघडले असल्याने त्याचेकडे कोरा कागद उपलब्ध नव्हता, पण आम्ही घाईत असल्याने त्याला "कोणत्याही जुन्या कागदावर तरी झेरॉक्स दे" असा आग्रह केला. त्यावरून त्याने एक कागद दाखवला, आम्ही त्याला "ठीक आहे" म्हणताच त्याने त्याचेवर झेरॉक्स काढून दिली. लिहिलेला कागद दुसऱ्या मित्राला देऊन, काढलेली झेरॉक्स राजू कडे खिडकीतून दिली. राजू च्या हाती ती चिट लागताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कसे बसे तीन तास संपून पेपर सुटला. 

                    राजू बाहेर येतांना त्याच्या चेहऱ्यावर जणू काही त्याने गोल्ड मेडल जिंकल्यासारखेच  भाव होते. आम्ही त्याची चौकशी केली, "कसा गेला पेपर, पास होशील कि नाही."   " पेपर एक नंबर गेला गा, नुसता पासच नाही तर ७०% तरी मार्क्स भेटीनं गा ! ", तो असे म्हणताच माझ्या लहान भावाने म्हटले, "तो होजाये, चहा नाश्ता पार्टी", "चालणं त मंग", असे म्हणत राजुने एका रेस्टोअरेन्ट मध्ये आम्हाला नेले. त्या ठिकाणी आम्ही बोलत-बोलत नाश्ता आटोपला,  चहा पिता पिता आमच्या चर्चा रंगात आल्या. मी राजुला विचारले, "किती प्रश्न सोडविले" यावर राजू म्हणाला, "आठ प्रश्न सोडविले........., पण गणितं कितव्या प्रश्नात होतं रे?" हे ऐकताच आमच्या दोघांच्याही कपाळावर आठया पडल्या. आम्ही दोघेही विचारात पडलो. माझ्या लहान भावाने मला शांत राहण्याचा इशारा केला व राजूस म्हटले, " आम्ही दिलेली कॉपी लिहिलेस कि नाही?"  "हो तं त्यांच्यातलेसतं होय बे थे गणितं" असे राजुने उत्तरताच आमच्या तोंडातील चहाचा फफकाराचं उडाला. परंतु आम्ही ते कंट्रोल केले. 

          राजू पुढे म्हणाला, "पण तुम्ही दिलेल्या कॉपी तुन एक साईड पूर्ण लिहिली, अन दुसऱ्या साइड्ची लिहायला गेलो तर वेळच झाला, आनं बेलच वाजली.................. "   

              यावर लहान भाऊ म्हणाला, " कोणती साईड लिहिली बे गणिताची का?"

              राजू म्हणाला, "हो"

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


----०००----

(टीप - सदर लेख हा काल्पनिक असून त्यातील पात्र सुद्धा काल्पनिक आहेत, नावात साम्य असल्यास हा फक्त योगायोग असेल. वाचण्यास गोडी किंवा विनोद निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यातील भाषा सुद्धा खेडपटच वापरण्यात आली आहे.) 

                 

 







       

Friday, 4 March 2022

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, तो जीवलग असतो.

 सख्खे मित्र असावेतच


एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ? 

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले, महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिले तर नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.

या कथेचे सार.

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की, तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र  शिकलेला  वा  अडाणी  असावा असं काही नसतं. कारण-  मित्र हा मित्रच असतो तो जीवलग असतो.