Tuesday, 8 March 2022

#बालपणीच्या गमती -जमती # - 3 -- परीक्षा आणि मित्र --

                   मित्रांनो, बोर्डाची परीक्षा म्हटले की, विध्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येनारा विषय, काही विध्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात तर काहींना बरेच प्रयत्न करूनही यश लवकर येत नाही. काही महाभाग मात्र चिटिंगचा सहारा सुद्धा घेतात. परीक्षेच्या काळातील काही ना काही आठवणी प्रत्येकांच्या मनात असतातच, त्यापैकीच हा माझ्या आठवणीतील एक किस्सा. 

                  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा विषय म्हणजे फार मोठा वीक पॉईंट, तश्यातच आमचा ग्रामीण भागातील एक मित्र "राजू" हा तीनदा दहावीची परीक्षा देऊनही उत्तीर्ण होऊ न शकलेला विद्यार्थी, त्यामुळे आमच्या चिडविण्याचा विषय ठरलेला मित्र. नापास असल्यामुळे त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण सुद्धा त्याचेवर नाराजच असायचे.

                 हा आमचा मित्र आमच्या घराशेजारीच राहायचा, तो माझ्यापेक्षा दोन वर्ष जुनियर होता. मी सायन्स चा विध्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे तो त्याच्या काही अभ्यासाच्या अडचणी विचारायला यायचा पण तेवढ्यापुरतेच, त्याचे अभ्यासापेक्षा बॉडी बिल्डिंग, जिम याकडे त्याचा जास्त कल असायचा. तो दिसायलाही धिप्पाड, मजबूत बांध्याचा दिसायचा. आई, वडील, भाऊ, बहीण "अभ्यास कर",  "अभ्यास कर" वारंवार म्हणत, त्यामुळे त्यांना दाखविण्यासाठीच जणू माझ्याकडे तो यायचा. मला तो भाऊ म्हणायचा. 

                कालांतराने त्याची बोर्डाची परिक्षा जवळ आली, तो माझ्याजवळ येऊन म्हणाला "भाऊ, म्हाहे सर्व पेपर्स निंघालेत गा, पण फक्त हा इंग्रजी विषयच राहिला गा!!", "तू काहीही कर, पण मले इंग्रजी पेपर पास कराले मदत कर, मी तुले चहा नाश्ता पार्टी देईन". 

                   आता परीक्षा जवळ आल्यामुळे तो अभ्यास करायला माझ्या घरी रोज यायला लागला. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर उठून तो जायचा, त्याच्या अभ्यासासाठी माझा धाकला (लहान) भाऊ सुद्धा मदत करायचा, परंतु दुसऱ्या दिवशी काल अभ्यास केलेल्या भागावरचे प्रश्न विचारले असता, त्याला त्याचे उत्तर सांगता यायचे नाही.  अशीही त्याची अफाट बुद्धिमत्ता. 

                  शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला, "कसागा भाऊ! माझा त पुररा!! अभ्यास झालास त नाही. मले कापी तरी पुरोवजोगा!!",  अश्या आर्त स्वरात तो मला व माझ्या धाकल्या(लहान) भावाला म्हणाला. आम्हा दोघांनाही त्याची किंव आली.  परीक्षेचे सेंटर गावातच होते. आम्ही दोघेही (मी व माझा लहान भाऊ ) सकाळी लवकर उठून तयारी करून त्याला घेऊन, अकरा वाजताचा पेपर असल्यामुळे साडे दहा वाजताच परीक्षा केंद्रावर पोहोचलो. आम्ही सोबत असल्यामुळे राजू ची हिम्मत खूप वाढली, त्याचा आत्मविश्वासही सातव्या मजल्यावर होता.  त्याला बेस्ट ऑफ लक देऊन आम्ही परीक्षा केंद्राबाहेर थांबलो.

                     थोड्या वेळाने मोट्ठ्याने आवाज आला. "महेश भाऊ, ओ .......महेश भाऊ, हे....  हे...... इकडे..... , मागे.... ,  आssगा!!, ....  माझा नंबर खिडकीजवळच लागला गा". पाहतो तर काय? "राजू" खिडकी जवळून आवाज देत होता.  खिडकी जवळ नम्बर लागल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

                     थोड्या वेळाने पेपर सुरु झाला. कोणीतरी दहा मिनिटातच काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लिहून खिडकी बाहेर फेकले. माझ्या लहान भावाने ते घेऊन एका कागदावर त्याची उत्तरे लिहून तयार केली. पण त्याच्या दुसऱ्या मित्रांना सुद्धा ते पुरवायचे असल्याने आम्ही एखाद्या झेरॉक्स सेंटरचा शोध केला,  ते जवळच मिळाले पण त्याने नुकतेच दुकान उघडले असल्याने त्याचेकडे कोरा कागद उपलब्ध नव्हता, पण आम्ही घाईत असल्याने त्याला "कोणत्याही जुन्या कागदावर तरी झेरॉक्स दे" असा आग्रह केला. त्यावरून त्याने एक कागद दाखवला, आम्ही त्याला "ठीक आहे" म्हणताच त्याने त्याचेवर झेरॉक्स काढून दिली. लिहिलेला कागद दुसऱ्या मित्राला देऊन, काढलेली झेरॉक्स राजू कडे खिडकीतून दिली. राजू च्या हाती ती चिट लागताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कसे बसे तीन तास संपून पेपर सुटला. 

                    राजू बाहेर येतांना त्याच्या चेहऱ्यावर जणू काही त्याने गोल्ड मेडल जिंकल्यासारखेच  भाव होते. आम्ही त्याची चौकशी केली, "कसा गेला पेपर, पास होशील कि नाही."   " पेपर एक नंबर गेला गा, नुसता पासच नाही तर ७०% तरी मार्क्स भेटीनं गा ! ", तो असे म्हणताच माझ्या लहान भावाने म्हटले, "तो होजाये, चहा नाश्ता पार्टी", "चालणं त मंग", असे म्हणत राजुने एका रेस्टोअरेन्ट मध्ये आम्हाला नेले. त्या ठिकाणी आम्ही बोलत-बोलत नाश्ता आटोपला,  चहा पिता पिता आमच्या चर्चा रंगात आल्या. मी राजुला विचारले, "किती प्रश्न सोडविले" यावर राजू म्हणाला, "आठ प्रश्न सोडविले........., पण गणितं कितव्या प्रश्नात होतं रे?" हे ऐकताच आमच्या दोघांच्याही कपाळावर आठया पडल्या. आम्ही दोघेही विचारात पडलो. माझ्या लहान भावाने मला शांत राहण्याचा इशारा केला व राजूस म्हटले, " आम्ही दिलेली कॉपी लिहिलेस कि नाही?"  "हो तं त्यांच्यातलेसतं होय बे थे गणितं" असे राजुने उत्तरताच आमच्या तोंडातील चहाचा फफकाराचं उडाला. परंतु आम्ही ते कंट्रोल केले. 

          राजू पुढे म्हणाला, "पण तुम्ही दिलेल्या कॉपी तुन एक साईड पूर्ण लिहिली, अन दुसऱ्या साइड्ची लिहायला गेलो तर वेळच झाला, आनं बेलच वाजली.................. "   

              यावर लहान भाऊ म्हणाला, " कोणती साईड लिहिली बे गणिताची का?"

              राजू म्हणाला, "हो"

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


----०००----

(टीप - सदर लेख हा काल्पनिक असून त्यातील पात्र सुद्धा काल्पनिक आहेत, नावात साम्य असल्यास हा फक्त योगायोग असेल. वाचण्यास गोडी किंवा विनोद निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यातील भाषा सुद्धा खेडपटच वापरण्यात आली आहे.) 

                 

 







       

No comments:

Post a Comment